ज्या क्षणी आपण आपल्या आजूबाजूला काय आहे ते खरोखर पाहतो, त्या क्षणी जगातील प्रत्येक गोष्टीतील परस्परसंवादाचे मंत्रमुग्ध करणारे नमुने स्पष्ट होऊ लागतात. ह्या उन्हाळ्यात माझी एका नवीन झाडाशी ओळख झाली. काही विद्यार्थ्यांनसह मी कर्नाटकच्या कोडगू भागात असताना आम्हाला एका नवीन झाडाची ओळख झाली. ह्या झाडाचे वैज्ञानिक नाव सायझिजियम झेलॅनिकम असे आहे. नाजूक पांढऱ्या फुलांनी भरलेल्या ह्या झाडाजवळ जाताच हे लक्षात आले की त्यावर अनेक वेगवेगळया प्रकारचे कीटक आहेत. कीटकांचे निरीक्षण करताना कोणीतरी फुलांचा वास घेण्याचा प्रयत्न केला. आहाहा! फुलासारखाच नाजूक पण कोणालाही आवडेल असा सुगंध. आपल्या ओळखीच्या जांभळाच्या झाडाचे नातेवाईक असणार्‍या ह्या झाडावर शेकडो पतंग (मॅक्रोब्रोचिस गिगास जातीचे) आणि इतर कीटक घिरट्या घालताना दिसत होते. त्या झाडाभोवती भिरभिरणाऱ्या असंख्य कीटक, फुलांचा मोहक वास, या सगळ्यामुळे ते एक जादुई दृश्य झाले होते. जंगलात काम करायला शिकणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांच्या सहवासामुळे हे दृश्य अधिकच खास बनले होते. फूल आणि पतंग यांचे एकमेकांशी नाते असते त्याप्रमाणेच विद्यार्थी त्या झाडाच्या अवतीभवती फिरून त्याचे निरीक्षण करू लागले.

सायझिजियम झेलॅनिकम फक्त भारतातच नाही तर श्रीलंका, मलेशिया, चीन, आणि इतर प्रदेशांमध्ये, विशेषतः दक्षिण – पूर्व आशियातील देशांमध्ये आढळते. मराठीमध्ये ह्या झाडाला भेडस किंवा पिटकुली या नावांनी ओळखतात. ह्या झाडाचे वैशिष्ट्य हे की त्याची फुले फांद्यांच्या अगदी टोकाला येतात. ह्याची जाडसर लांब पाने वर्षभर हिरवी राहतात व गळत नाहीत.

मे महिन्यात फार कमी झाडे बहरलेली असतात, त्यामुळेही कदाचित ह्या झाडावर मोठय़ा प्रमाणात वेगवेगळया प्रकारचे कीटक अवलंबून असावेत. पतंग म्हणजेच रात्री दिव्यांच्या आजुबाजूला दिसणारे, सहसा करड्या, तपकिरी रंगाचे फुलपाखराचे नातलग खरे म्हणजे अनेक प्रकारात आढळतात. त्यातील एक प्रकार रात्री नाही तर दिवसाढवळ्या दिसतो, आणि अनेकदा लाल, पिवळ्या रंगांनी सजलेला असतो. ती फुलपाखरेच आहेत असा गैरसमज होऊ शकतो. पण नीट निरिक्षण केले तर हे लक्षात येते की पतंगांप्रमाणे त्यांच्या संवेदनाग्र किंवा अँटेनांवर पिसांप्रमाणे अनेक छोटे केस असतात. इतर पतंगांप्रमाणे हे सुद्धा त्यांचे पंख सपाट ठेवून बसतात. ह्या पतंगांशिवाय आम्ही बघितले की दोन प्रकारच्या मधमाश्या, इतर काही – 5-6 प्रकारच्या माश्या आणि मुंग्या, असे अनेक कीटक ह्या झाडावर आणि त्याच्या आजुबाजूला होते. अशा प्रकारचे कीटक जेव्हा पिटकुलीच्या फुलांना आकर्षित होतात तेव्हा ते परागीभवनास मदत करतात. म्हणजे कीटकांना खाऊ मिळतोच पण झाडालाही त्याचा फायदा होतो. सहजीवनाचे हे एक चांगले उदाहरण.

आमच्या हेही लक्षात आले की आम्ही पाहिलेली पिटकुलीची झाडे दाट जंगलात नसून जंगलांच्या सीमारेषेवर किंवा थोड्या खुल्या जंगलांमध्ये आहेत. अनेक गोष्टींचे निरीक्षण करत करत तासन्‌तास घालवता येतील असे हे झाड. कोडगू मधील त्या दिवसानंतर त्या भागातून फिरताना ते झाड कोणाच्याही नजरेतून सुटायचे नाही. त्यानंतर कुठे पिटकुली दिसली, की लगेच विद्यार्थ्यांचे लक्ष तिथे जायचे. तुम्हाला कधी हे झाड दिसले तर नक्कीच त्याचे जवळून निरीक्षण करण्यासारखे हे आहे. निसर्ग निरीक्षण हे तडे वेड लावणारे असते म्हणा, एकट्याने केले तरीही पण एकमेकांबरोबर निरीक्षण करताना त्यात एक वेगळीच मजा असते.


About the author: Ovee Thorat is a researcher and a political ecologist. She teaches at Azim Premji University, Bangalore.