पावसाळा आला कि सगळ्याच सृष्टीची मरगळ संपते, सर्वत्र हिरवाई आणि झाडांना नवसंजीवनी मिळून ती अधिक जोमाने वाढतात. मग यातच नव्याने सहजीवन सुरू होतं.

नव्या नव्या रोपट्यांवर नवे जीव जन्म घेतात, काही पक्षी परतून परत घरटी बांधतात. रान फुले, गवत यावर भिरभिरणारी सुंदर फुलपाखरं,असंख्य रंगिबिरंगी किटकं. सारचं जसं नव्यानं सृष्टीत अंकुरत, बहरत. तसच काहीसं मी बहाव्याच्या बाबतीत पाहिलं.

मागच्या वर्षी लावलेलं हातभर असणार बहाव्याच रोप पाऊस पडताच जोमानं वाढू लगल़ं. मजलदरमजल करत ते अगदी पाच फुट झालं.

त्याची वाढ नजरेत आली म्हणून मी झाडाजवळ जाऊन बघीतल तर काय? पानोपानी छान हिरवी हिरवी सुरवंट…परदेशी (common emigrant)या फुलपाखराची. कुठे दोन तर कुठे चार, कुठे अगदी मोठाच समुह. जवळ गेले नसते तर ते लक्षात आलच नसतं, म्हणजे camouflage का काय असे ते… बहाव्याच्या पानाच्या रंगात रंगलेले, एकरूप झालेले.

गंमतच आहे ना निसर्गाची… सुरवंटा साठीच बहाव्याला एवढी पानं आली, अस वाटलं.

बघता बघता पानं सुररवंटानी गट्टम केली, फक्त मधल्या शिरा तेवढ्या फांदीवर राहिल्या पानांनच अस्तित्व दाखवायला.

आता झाडावर पानं तशी नावालाच पण असंख्य परदेशी भिरभिरतायत हिरवळीवर, फुलातले पराग वेचत. श्रावण आल्याचा सांगावा, असंच काहीसं वाटतंय.


परिचय :सारू पवार एक गृहिणी आहे. निसर्ग, पर्यावरण हे तिचे आवडते विषय आणि छंदही आणि या बाबतीत लोकजागृती साठी प्रयत्नरत.